
नंदुरबार ! Nandurbar/SKpublicvoice
प्रतिनिधी/नरेश वळवी
नंदुरबार येथील नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २४ डिसेंबरला संपत असल्याने नगरपालिकेतील मंजूर विकास कामांचे दिवस-रात्र एक करून भूमिपूजन करण्यात येत आहे. पुढील अवघ्या २ दिवसांत तब्बल २६ विकास कामांचे भूमिपूजन शिवसेनेचे शिंदे गट नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी हस्ते करण्यात आले. तर उर्वरित विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी व शनिवारी म्हणजे शेवटच्या दिवशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, १४ कोटी रुपये खर्चाच्या कामांची ६ कंपन्यांची निविदा पालिकेने यापूर्वीच फेटाळली आहे. त्या विरोधात साई सूर्या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाच्या निकालानंतर जुनी भोईगल्ली, श्री दादा गणपती मार्ग यासह २३ कामांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे.
येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २४ डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमांप्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पुष्पेंद्र रघुवंशी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभापती राकेश हासानी, नगरसेवक परवेज खान, नगरसेवक रवींद्र पवार, जगन्नाथ माळी, नगरसेविका भारती राजपूत, ज्योती राजपूत, मनीषा वळवी, सोनिया राजपूत, पत्रकार हिरालाल चौधरी, फारुख मेमन, रियाज कुरेशी, चेतन वळवी, मोहितसिंग राजपूत, अतुल पाटील यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
१४ काेटींच्या कामाचे प्रकरण न्यायप्रविष्ट
शहरात नगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या १४ कोटींच्या कामाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्या संदर्भात भाष्य करणे उचित ठरणार नाही.-अमोल बागुल, मुख्याधिकारी, न.पा.
ठेकेदार व पदाधिकाऱ्यांच्या वादात प्रकरण न्यायालयात मोठ्या परिश्रमाने कामे मंजूर झाली होती. कामे करणार असलेले ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्या वादात हे प्रकरण न्यायालयात गेले.-चारुदत्त कळवणकर, विरोधी पक्षनेता
शहरातील या कामांचे झाले भूमिपूजन
कामनाथ महादेव मंदिरालगत सि.कॉ. करणे व पेव्हर ब्लॉक बसवणे, प्रभाग क्र. १९ मध्ये मिलिंद माळी यांच्या घरापासून पूर्वेस अंकुश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, सरस्वती नगरामधील सभामंडप, धुळे रोडवरील नेहा पार्क मागेपासून ते मेन नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, रुखमाई नगरासह राम नगरामधील खुल्या जागेत सभामंडपाचे बांधकाम, गवळीवाडा परिसरासह परदेशी पुरामध्ये सभामंडपाचे बांधकाम, इमाम बादशाह पाण्याची टाकीचे बांधकाम, बिफ मार्केट लगत असलेल्या सामाजिक सभागृहालगत चेंजिंग रुम, लोखंडी जीना बसवणे, कसाई वाडा चौकातील बिलाल कुरेशींचे घर ते रशीद अब्बास कुरेशींच्या घरापर्यंत काँक्रिट गटार लाईन टाकणे, कसाई वाडा चौकातील पारु पैलवान यांचे घर ते मेहबूब कुरेशींच्या घरापर्यंत काँक्रीट गटार लाईन टाकणे, अग्निशमन केंद्राच्या मागील बाजूस कंपाउंडसह शिरीषकुमार नगर, जयचंद नगर, लक्ष्मी नगरातील सभामंडपाचे बांधकाम, बादशाह नगरामधील आरिफ शेख यांच्या घरापासून ते मेन नाल्यापर्यंत पाइप गटार लाइन टाकणे, प्रशांत नगरात खुल्या सभामंडप बांधकाम.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹