रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.


नंदुरबार l Nandurbar/ SKpublicvoice


         दि.25 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2022 साठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे. 

रब्बी हंगामासाठी नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोग यामुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिकांच्या पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गिक आपत्ती,आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळी परिस्थिती यासाठी संरक्षण देय आहे. योजनेत समाविष्ट शेतकऱ्यांनी बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनी, बँक, किंवा कृषि अथवा महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक 11004195004 वर कळवावे. ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई यांच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र असून ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी मुदतीपुर्वी नजीकच्या बँक व आपले सरकार सेवा, जन सुविधा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. 

योजनेत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा दर पुढील प्रमाणे: रब्बी ज्वारी पिकासाठी : प्रति हेक्टरी 32 हजार 500 विमा संरक्षित असून  शेतकरी हिस्सा (हप्ता) 487.50 रुपये प्रती हेक्टरी असून पिक विम्यात सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर, 2022 आहे.

गहु पिकासाठी : प्रति हेक्टरी 45 हजार विमा संरक्षित असून शेतकरी हिस्सा (हप्ता) 675 रुपये प्रती हेक्टरी आहे. हरभरा पिकासाठी 35 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकरी हिस्सा (हप्ता) 562.50 रुपये प्रती हेक्टरी असून दोन्ही पिकासाठी पिक विम्यात सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर,2022 आहे.

उन्हाळी भुईमूग पिकासाठी: प्रति हेक्टरी 40 हजार विमा संरक्षित असून शेतकरी हिस्सा (हप्ता ) 600 रुपये प्रती हेक्टरी असून पिक विम्यात सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 31 मार्च,2023 अशी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹
        🌹 प्रतिनिधी नेमणे सुरू आहे.🌹


जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.
मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी
📱9529255354

Post a Comment

Previous Post Next Post