धुळे /प्रतिनिधी :विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र, आयोजित भाषा व संस्कृती जागर परिषद धुळे येथील गरूड वाचनालयातील शिंपी सभागृहात संपन्न झाली. या परिषदेला सुप्रसिद्ध गायक भास्कर अमृतसागर यांच्या राज्य गीतांनी व अँड.विशाल साळवे यांच्या संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले.
खान्देशात विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात विशेषत: अहिराणी,कोकणी,मावची, वसावे, पावरी, भिलाऊ अशा बोलीभाषा अस्तित्वात असतांना प्रमाण भाषेच्या नावाखाली किंवा अभिजात दर्जाच्या दहशतीखाली या भाषांचा बळी न घेता आमच्या बोलीभाषांसह मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे आणि हिंदी भाषेची सक्ती रद्द झाली पाहिजे असे आजच्या भाषा व संस्कृती जागर परिषदेचे स्वागताध्यक्ष अहिराणी साहित्यिक प्रा. डाॅ.सदाशिव सुर्यवंशी सांगितले.
धर्म आणि जातीच्या आधारावर इथले सरकार भेदभाव करत आहेत.संविधान आणि लोकशाहीने दिलेले अधिकार भाषिक अधिकार जे दिले आहेत ते टिकवले तरच आपले अधिकार राहतील. असे भाषा सल्लागार समिती सदस्य डाॅ.प्रकाश परब (मुंबई) यांनी सांगितले.
तर पिंपळनेर येथील फुले-आंबेडकरी साहित्यिक मराठी भाषेचे प्रा. डाॅ.सतिष मस्के यांनी मराठी ही जगातील १० वी भाषा आणि भारतातील ३ री भाषा तरीही मराठी भाषेवर हिंदीची सक्ती लादण्याचे कारण काय ? असा प्रतिप्रश्न केला.महाराष्ट्रात मागील महिन्यात १५ आदिवासी आश्रम शाळा शिक्षकांअभावी बंद तर १५ हजार जि.प.शाळा बंद झाल्या आहेत त्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा सक्ती केली जात आहे.असे आदिवासी शिक्षण चळवळीचे सत्यशोधकचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष व विद्रोही पदाधिकारी काॅ.आर.टी.गावित यांनी सांगितले.
आदिवासी मुले शाळेत येतांना त्यांच्या मातृभाषेनंतर दुसरी भाषा मराठी शिकतात, तिसरी भाषा इंग्रजी शिकतात आणि आता फडणवीस सरकार चौथी भाषा हिंदी लादत आहे.यामुळे आदिवासी विशेषत: मुले-मुली शाळेलाच घाबरतील आणि त्यांची भाषेच्या आधारे शैक्षणिक कत्तल होईल याला फडणवीस, शिंदे सरकार यांचे मनुवादी सरकारचे धोरण जबाबदार आहे असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक,सत्यशोधकचे नेते काॅ.किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.
तर अध्यक्षस्थानावरून बोलतांना ठाकरे बधूंना निमित्त ठरलेले मुंबईतील भाषिक लढ्याचे नेते डाॅ.दिपक पवार यांनी हिंदीची सक्ती लादण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण जबाबदार असल्याचे सांगितले.एक धर्म हिंदु,एक पक्ष BJP, एक झेंडा, एक भाषा या आधारे भारतातील विविधता व बहुसांस्कृतिकता संपवून एक साचीपणा म्हणजेच उच्च जातवर्गीयांची संस्कृती लादण्याचे मोदी-फडणवीस यांनी ठरवले आहे.म्हणूनच ते कारण नसतांना मुलांना तीन, चार भाषा सक्ती करत आहे.
या परिषदेला जमलेल्या शेतकरी-शेतमजूर व आदिवासी स्त्री-पुरूषांच्या उपस्थितीमुळे मराठी भाषिक लढ्याला बळ मिळाल्याने त्यांनी संयोजकाचे आभार मानले.म.फुले रचित सत्याचा अखंड सामूहिकपणे गाऊन परिषद समाप्त झाली.प्रमुख पाहुणे परिचय अशपाक कुरेशी यांनी करून दिला तर सूत्रसंचालन मंसाराम पवार यांनी केला.तर आभार एल.जे.गावित केले.सुप्रसिद्ध अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे यांनी अहिराणी कवितेतून व्यथा मांडली.या परिषदेला निलाबाई मोरे,साहित्यिक बाबा हातेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.









