
शहादा l shahada/SKpublicvoice
महाराष्ट्रापेक्षा ३०० रुपये जास्तीचा भाव, लगेच रोख पैसे मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खेतिया बाजार समितीत कापूस विक्रीला पसंती मिळत आहे. या बाजार समितीत खान्देशातून सुमारे ७५ ते ८० टक्के कापूस विक्रीला येतो. विशेष म्हणजे, खेतिया मंडी प्रशासन शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची मोजणीची फी, हमाली कापली जात नाही. म्हणून शेतकऱ्यांना कुठलाही खर्च लागत नाही. गेल्या वर्षी उच्चांकी १२ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. तर यंदा ८ हजार ५०० रुपये सध्या भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील खेतिया या ठिकाणी मध्य प्रदेश शासनाची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या ठिकाणी मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, गहू, हरभरा यासह प्रामुख्याने कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. परिसरात कापसाच्या प्रेसिंग आणि जिनिंग प्रक्रियेचे मोठे उद्योग असल्याने याठिकामी महाराष्ट्रापेक्षा प्रतिक्विंटल मागे २०० ते ३०० रुपये अधिक दर मिळतो.
तसेच या बाजार समितीत व्यापाऱ्यांची मुक्तपणे बोली लागत असल्याने व्यापाऱ्यांच्या स्पर्धेत शेतकऱ्यांना इतर ठिकाणापेक्षा आपल्या मालाला अधिक दर मिळतो. शिवाय खेतिया मंडी प्रशासन शेतकऱ्याकडून कोणतीही मोजणी फी किंवा हमाली कापली जात नाही. म्हणून शेतकऱ्यांना कुठलाही खर्च लागत नाही. कापूस दिल्यावर दोन लाखांपर्यंतचे रोख मूल्य दिले जाते. उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसने टाकण्यात येते. खान्देशातून प्रामुख्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अधिक कापूस विक्रीला येतो.
कापूस पिकाला मिळतो उचित दर
खेतिया बाजार समिती येथे कापसाला उचित दर मिळतो. आपल्या भागात कापूस पिकाची बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा पिकाचा हवा तसा मोबदला मिळत नाही. स्पर्धात्मक बोली लागत असल्याने दर मिळतो. म्हणून खान्देशातून शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात.- योगेंद्र बगल, निमगुळ, ता. शिंदखेडा जि.धुळे
मंडी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सुविधा
खेतिया येथील बाजार समितीत खरेदी केलेल्या पिकाला दोन लाखांपर्यंत रोख रक्कम दिली जाते. त्याचे प्रतिदिन वाटप होते. खुल्या बोलीमुळे शेतकऱ्यांना दर चांगला मिळतो. तसेच मंडी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सर्व सुविधा देण्यात येतात. शेतकरी बांधवांनी आपले कापूस पीक या ठिकाणी विक्रीस आणावे.-मन्साराम जमरे, सचिव: बाजार समिती, खेतिया.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹